प्रतिभेला स्वैरमुक्त वाट करून देऊन जे जे सुंदर आहे... उदात्त आहे... अलंकारप्रचुर आणि देखणे आहे... ते ते सुंदर शब्दांत आणि देखण्या भावरूपात शब्दबद्ध करून वाचकापर्यंत पोहचविणे हा या ललित लेखसंग्रहाचा मुख्य उद्देश असला तरी, ललित साहित्य हे स्वांत सुखासाठीच लिहायचं असतं. मराठी भाषेतील नऊ रसांपैकी सर्वच रस मुक्तहस्ते उधळून आनंद घेता येतो आणि वाचकांना देता येतो. हे या लिखाणाचे मुख्य वैशिष्ट्य मानता येईल. या लिखाणात भावचिंतन आणि स्वैरमुक्त चिंतन भाषिकसौंदर्याद्वारे अभिव्यक्त करता येते. अशा लिखाणाला शब्द सौंदर्य, भाव सौंदर्य, भाषा सौंदर्याची आवश्यकता असते. त्यामुळे ललित लेखक हा 'भाषाप्रभू' असणे आवश्यक असतो.
लेखक प्र. श्री. जाधव हे निश्चितच भाषाप्रभू लेखक आहेत, याची जाणीव होते. जाधव यांची भाषा लक्षवेधी असून ओघवत्या भोषेचे रूपदर्शन या ललित लिखाणात होते. हे भाषेचे राघव रूपसौंदर्य निर्झरासारखे थुईथुई करीत आले आहे. या ललित लेखसंग्रहाचे शीर्षक 'मनमोराचा पिसारा' असे आहे. कारण मोरपिसारा देखणा असतो. त्याच्या रूप मनोहरी रंगच्छटा मोहवून टाकतात. लेखक प्र. श्री. जाधव यांच्या प्रतिभेच्या पिसाऱ्यातील रंगच्छटा मुक्त-भावमुक्त-विमुक्त होऊन आल्या आहेत. मोर जसा सुंदर असतो, तसाच हा लेखसंग्रहही अमित मनोहर आहे. देखणा आहे. यातील भाव-विभाव काही और आहेत.
रसाळ शब्द माधुर्य, काव्यात्मक प्रतिभेच्या संवेदना ह्या सौंदर्यानुभूतीचे विभ्रम घेऊन येतात. निसर्गसौंदर्य आणि सुरेख शब्दसौंदर्य, शब्दलालित्य याचा सुंदर गोफ गुंफून जाधव यांनी ललित लिखाणाचा प्रांत सशक्त केला आहे. निळ्या निळाईचे अंबरघन आणि श्रावणसरी ह्या लेखकांच्या प्रतिभेला आवाहित करतात आणि त्यातून फुलते-फुलारते एक जीवशीव सृष्टीचे तत्त्व. जे की, निसर्गराजीत समाविष्ट झालेले ते एक गूढरम्य विवर आहे.
भलेही यास कोणी 'कृष्ण विवर' म्हणतील, पण असेच एक विवर या लेखाच्या माध्यमातून पुढे आले आहे. कळत नकळत त्यात संधीप्रकाशाच्या भावस्फुल्ल रंगच्छटा प्रस्फुटित झाल्या आहेत. म्हणून हे गद्य स्वरूपातील दीर्घकाव्य भावविभोर होऊन आले आहे. हे शब्ददान असेच शब्ददहिवरात फुलत राहो. या निमित्ताने लेखक आणि वाचक या दोघांनाही पुन्हा पुन्हा याच श्रावणसरीत चिंबचिंब होऊन झरझरण्यासाठी मनस्वी अभीष्टचिंतन..!
नरेंद्र नाईक, नांदेड.
प्रतिभेला स्वैरमुक्त वाट करून देऊन जे जे सुंदर आहे... उदात्त आहे... अलंकारप्रचुर आणि देखणे आहे... ते ते सुंदर शब्दांत आणि देखण्या भावरूपात शब्दबद्ध करून वाचकापर्यंत पोहचविणे हा या ललित लेखसंग्रहाचा मुख्य उद्देश असला तरी, ललित साहित्य हे स्वांत सुखासाठीच लिहायचं असतं. मराठी भाषेतील नऊ रसांपैकी सर्...
Read More